Tuesday, July 27, 2010

झाड कसे बनते मम्मा ?

संध्याकाळचा चहा घेत मी आणि आशय बाल्कनीत गप्पा मारत बसलो होतो. समोरच्या झाडाकडे पाहत आशयने विचारले,"मम्मा झाड कसे बनते ?
मी आशयला विचारले,'तूला काय वाटते सांग पाहू ?'
मग आशय मोठे मोठे डोळे करून म्हणाला,"छोट्या झाडापासून ! पण मम्मा छोटे झाड कसे बनते ? पुढच्या सगळ्या संभाव्य प्रश्नांचा अंदाज येऊन आशयला झाडाच्या निर्मितीची पूर्ण प्रक्रिया सांगणे मला गरजेचे वाटले.
मी म्हणाले,'आशय तू वेग-वेगळ्या, छोट्या छोट्या झाडाच्या बिया पाहिल्या आहेस न (आजी आबा आणि आत्यासोबत बागेत थोडेफार काम केले असल्याने याची माहिती आशयला होतीच), त्या मातीत लावून त्यांना व्यवस्थित पाणी दिले, त्यांची काळजी घेतली न कि त्याचे छोटे रोप बनते मग ते रोप वाढत वाढत मोठे होऊन त्याचे झाड तयार होते'.
झाडाकडे पाहून झाल्यावर, माझ्या कडे पहात पहात माझ्यामागे असलेल्या खिडकीकडे सहजपणे पाहत आशयने परत विचारले, "अच्छा! आणि मम्मा ही खिडकी कशी बनते ?"
त्याच्या चिकित्सक वृत्तीचे मला हसू आले, पण ते त्याला जाणवू न देता मी शान्तपणे उत्तरले, 'ही खिडकी न, झाडाच्या लाकडापासून तयार होते '.
"पण मम्मा ती तयार कशी होते आणि कोण करतं ?" आशयने परत विचारले.
मी त्याला म्हणाले ,'झाड मोठे झाल्यावर त्याला कापून, त्याच्या लाकडापासून फळ्या तयार करतात आणि त्या फळ्या एकमेकाला जोडून त्यापासून खिडकी बनवतात आणि हे सगळे माणसेच करतात'.
खिडकीकडे नी झाडाकडे आळीपाळीने निरखून पाहात परत एकदा आशयने विचारले,"मम्मा हा रंग पण झाडावरच तयार होतो का जो खिडकीला लावलेला असतो ?"
आता मात्र मला हसू आवरता आले नाही. मी हसून त्याला म्हणाले, 'तुला काय वाटते हा रंग झाडावर तयार होऊ शकतो का ?'
आशय पण हसून म्हणाला "का ? होऊ शकत नाही का ?".
मग मी पण त्याची थोडी मजा घ्यायची ठरवली. मी त्याला म्हणाले, 'मग सांग बरे .. कोणकोणत्या झाडाचे खोड रंगीत असते ते ?'.
आशय पण तितक्याच खोडकरपणे म्हणाला,"मी अजून तरी कुठे रंगीत खोड नाही पाहिले मम्मा !!"
मग लाडात एक रट्टा मारत मी त्याला म्हणाले, 'तू सांग हा रंग कोणी दिला असेल या खिडकीला ते ?'
लबाड मुलगा लगेच उत्तरला,"रंग देणाऱ्या काकांनी. पण मम्मा, हा रंग तयार कोणी केला ? आपल्याला तयार करता येईल का ?".
आशयला रंग तयार करण्याची प्रक्रिया कशी सांगावी, त्याला काय उत्तर द्यावे याचा विचार करत असतानाच मनात एक विचार आला,"प्रश्नांची किती अखंड विचारशृंखला असते ह्याच्या डोक्यात !!".
तितक्यात दारावरची बेल वाजल्याने स्वारीने तिकडे धूम ठोकली आणि आमची प्रश्नमोहीम तिथेच थांबली.

Monday, July 12, 2010

शंकरबाप्पाने हे फार वाइट काम केले !!!

रोजच्या सारखी घाई गडबड नाही हे बघून आशयने मला विचारले, 'मम्मा आज सुट्टी आहे ? आज रविवार आहे ?' माझे 'हो' असे उत्तर ऐकून स्वारी धूम बैठकीत पळाली. रिमोट घेउन लगेच TV समोर बसली. मला लगेच सांगून झाले, कि आज सुट्टी आहे न ... म्हणून मी मला जे पाहिजेत ते - माझे प्रोग्राम बघणार. लगेच त्याच्या cartoon network चे channel लावले गेलेसुद्धा. पण तिथे त्याला हवा असलेला "मारुती मेरा दोस्त" सिनेमा संपत आला होता. तो पाहून झाल्यानंतर लगेच स्वारी हिरमुसली.
मी त्याच्या मर्जीविरुद्ध त्याच्याकडून रिमोट घेऊन कुठे कुठे काय काय कार्यक्रम लागले आहेत ते पाहत होते. एका ठिकाणी "बाल गणेश" हा सिनेमा लागला होता. मग लगेच माझ्या हातातून रिमोट घेऊन आशय मला म्हणाला "Thank you मम्मा". थोडक्यात मला सांगण्यात आले होते कि आता तू जाऊ शकतेस. मी पण मग फार विचार न करता माझ्या कामाला लागले.
थोड्या वेळाने सिनेमा कुठपर्यंत आला आहे, हे बघण्यासाठी म्हणून मी बैठकीत आले. तर आशय मला म्हणाला, "मम्मा, शंकर बाप्पाने हे फार वाइट काम केले". क्षणभर मला काही कळलेच नाही कि आशय अस का म्हणत आहे. त्याच्याजवळ बसत मी त्याला विचारले, "कसले वाइट काम बेटा ?". मग हळूच त्याने TV कडे बोट दाखवले. तरी मला काही कळेना. TV वर सिनेमामध्ये गणेश (गजमुख असलेला) खेळत होता.
मी परत भुवया उंचावून त्याला विचारले. मग पट्ठ्याने सांगायला सुरुवात केली. "मम्मा, शंकर बाप्पाने आधी गणेश बाप्पाचे ऐकले नाही. एवढ्याशा गणेश बाप्पासमोर शंकर बाप्पा खूप खूप नाचला आणि शेवटी त्रिशुळाने त्याला मारून त्याचे डोके उडवले. मग त्याला जिवंत करण्यासाठी बिचाऱ्या हत्तीणीच्या छोट्याशा पिल्लाला मारून टाकले आणि त्याचे डोके गणेश बाप्पाला लावले. आणि बाकी बरेच देवबाप्पा पण तिथे होते, ते पण कुणीच काही म्हणाले नाही. हे शंकर बाप्पाने फार वाइट काम केले मम्मा !! त्या बिचाऱ्या हत्तीला बोलता येत नव्हते म्हणून काय त्याला मारायचे ? छे !!". क्षणभर मला पुढे काय बोलावे हेच कळेना. शिवाय इतक्या वर्षापासून आपण ही कथा ऐकत आहोत पण आपल्याला हा मानवीय दृष्टीकोन कसा जाणवला नाही ह्याची शरम पण वाटली.
मी काहीच प्रतिक्रिया देत नाहीये हे लक्षात येऊन आशयने मला माझे मत विचारले. प्रामाणिकपणे मी पण त्याच्या मताला दुजोरा देत 'शंकर बाप्पाने असे करायला नको होते' अशी कबुली दिली.
त्याक्षणी मला आशयच्या हळव्या स्वभावाचा आणखी एक पैलू जाणवला. 'मुक्या प्राण्यांवर दया करावी, त्यांना उगीचच त्रास देऊ नये ' हे पूर्वी कधीतरी सांगितलेले, त्याच्या मनात इतके खोलवर रुतले असेल ह्याची मला जाणीवच नव्हती.
तितक्यात आशयने परत मला हाक मारून माझे लक्ष वेधले. 'गणेशबाप्पा त्याच्या भूषकाला लाडू का देत नाहीये ?' असे त्याने विचारले. मी म्हणाले कोणाला? परत तो उत्तरला "भूषकाला". मी हसून त्याला म्हणाले, 'बेटा त्याला 'भूषक' नाही तर 'मूषक' म्हणतात आणि गणेश बाप्पा त्याची गम्मत करत असेल. ते दोघेजण मित्र आहेत न मग मित्राने मित्राची गम्मत केली तर चालते न!'. "हो" म्हणत स्वारी पुन्हा 'बाल गणेश' पाहण्यात गुंग झाली.
मी पण आशयच्या व्यक्तिमत्वाचा एक नवा पैलू समजला, ह्या आनंदात कामाला लागले.

Thursday, July 8, 2010

SMS कसा येतो बाबा ?

आज काल मोबाईलचा होत असलेला सर्रास वापर मुलांवर, त्यांच्या वैचारिक क्षमतेवर किती वेग-वेगळ्या पद्धतीने परीणाम करतो हे त्यांचे प्रश्न ऐकूनच जाणवते.
ऑफिस मधून येऊन नुकतीच चहा करत होते. अमोल (आशयचा बाबा) स्वयंपाक घरात उभा राहून माझ्याशी गप्पा मारत होता. आशय खेळायला चल म्हणून हट्ट करत होता. त्याला सांगितले की चहा झाला की पिउन लगेच तुझ्यासोबत खेळायला येते, तोपर्यंत तू खेळण्याची तयारी कर. दोनच मिनिटांनी स्वारी परत बाबासमोर उभी. मला वाटले आता तो बाबाला खेळायला चल म्हणेल .. पण त्याच्या चेहरयावर फार वेगळ्या छटा दिसल्या. मी आणखी काही विचार करणार तेवढ्यात त्याचा बाबाला विचारलेला प्रश्न कानी पडला.
त्याने बाबाला विचारले "बाबा SMS कसा येतो आपल्या मोबाईलमध्ये ?"
मला मोठ्ठा प्रश्न पडला कि आता ह्याला सगळे तंत्र कसे समजावयाचे ? पण तोपर्यंत बाबाने त्याला उत्तर सांगायला सुरुवात केली होती.
बाबा त्याला म्हणाला "आशय मोबाईलच्यामागे battery आणि जे Sim card असते न त्यामुळे SMS येऊ शकतो, आणि आपण पण SMS पाठवू शकतो, पण ती battery charged असली पाहिजे आणि Sim card चालू असले पाहिजे."
(आत्तापर्यंत मोबाईल (बंद पडलेले) बऱ्यापैकी खेळायला मिळाल्याने battery म्हणजे काय ? battery charge करावी लागते, नाहीतर मोबाईल बंद पडतो, signal नसले कि फोन कट होतो वगैरे वगैरे, हे सर्व आशयला माहित झाले होते).
"बाबा म्हणजे battery च्या खाली जे पांढरे पांढरे छोटेसे असते, जे तू काढतोस आणि परत घालतोस, त्याला Sim card म्हणतात का ?" आशयने विचारले".
"हो" बाबा उत्तरला.
"अच्छा, म्हणजे तुम्ही मला जो मोबाईल खेळायला दिला आहे त्यातली battery चार्ज नाही आणि त्यातले Sim कार्ड पण चालू नाही, हो न ??"
मला अगदी मनातून हसू आले नि कौतुक पण वाटले, कि किती लवकर आशयने त्याला दिलेल्या मोबाईलची अवस्था आणि उपयोग होऊ शकत नाही हे ओळखले होते.
लगेच त्याने बाबाला विचारले, "तुझा आणि मम्माचा मोबाईल चालू आहे न ? मग तुम्ही मला 'चालू असलेला' मोबाईल कधी देणार ?"
मी बाबाकडे आता हा काय उत्तर देणार म्हणून हसत हसत बघत होते. बाबा तेवढ्याच संयमाने आशयला म्हणाला कि तू बारावी पास झालास न कि तुला छानसा मोबाईल मी घेऊन देइन.
कधीतरी आपल्याला आपला - चालू स्थितीतला मोबाईल मिळणार या गोष्टीवर खुश होऊन आशयची स्वारी खेळायला पळाली.
मी आणि बाबा आशयच्या चिकित्सक वृत्तीबद्दल कौतुकाने एकमेकांकडे पाहत राहिलो.