Wednesday, May 11, 2011

तारे कसे बनतात?

आशयला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या.
रोज काहीतरी नवीन पाहणे, ऐकणे आणि त्यावर चर्चा करणे हा त्याचा नित्याचाच दिनक्रम झाला होता.
पाळणाघरात दिवसभर धिंगाणा घालूनही त्याची खिलाडू वृत्ती आणि खेळण्याचा उत्साह दोन्हीही, संध्याकाळपर्यंत कमी झालेले नसायचे. त्यात सध्या सुट्ट्यांमुळे सगळीच मुले दिवस भर खेळत राहत.
आज माझाही सुट्टीचा दिवस म्हणून आम्ही सर्वजण टीव्हीसमोर बसून मजेत सिनेमा पहात होतो. तितक्यात त्यातल्या एका पात्राने मरणाविषयी काहीतरी सांगितले. आशयला "मरण आणि त्यानंतर काय ?" हा प्रश्न नेहमीच पडतो. आत्तापर्यंत खूप वेगवेगळ्या प्रकाराने त्याने याविषयी विचारून, जाणून घ्यायचा प्रयत्न केला होता. पण दरवेळेस आम्ही त्याला शिताफीने हा विषय बदलून दुसऱ्या गोष्टींकडे वळवायचो.
आज त्याने अचानक तो विषय पकडला. आम्हाला तो सांगू लागला, तुम्हाला माहित आहे, "माणूस मेल्यावर आकाशात जातो आणि तारा बनतो. मी आणि अमोल (आशयचा बाबा) एकमेकांकडे पाहून चमकलोच.कारण आम्ही काहीही न सांगता हा एवढ्या विश्वासाने याविषयी बोलत आहे. आमची पण उत्सुकता ताणली गेली. मी त्याला विचारले, 'तुला कुणी सांगितले हे ? कुठल्या सिनेमात पाहिलेस का ? का टीव्हीवर कळले ?'. सगळ्या प्रश्नांना नकारार्थी मान हलवून सावकाशपणे आशय म्हणाला, "हे तर मला क्षितिजने सांगितले (हा क्षितीज म्हणजे त्याचा पाळणाघरातला, त्याच्यापेक्षा १ वर्षांनी मोठा असलेला त्याचा मित्र)". मी परत त्याला विचारले, ' पण त्याला कुणी सांगितले ?'. आशयकडे याचेही उत्तर तयार होते. तो लगेच उत्तरला, "क्षितिजला त्याच्या मम्माने सांगितले. त्याचे दादाजी /आजोबा पण देवाघरी गेलेत न, तर ते पण तारा बनले आहेत आणि रोज रात्री क्षितिजला बघतात. म्हणून तर आकाशात इतके सारे तारे आहेत. मोजता पण येत नाहीत". मला कौतुक आणि चिंता वाटली. ही एवढी एवढीशी मुले, पाळणाघरात काय काय विषयांवर गप्पा मारतात !!
मी त्याला सांगितले कि, "बाळा, माणूस मेल्यावर तारा बनत नसतो आणि तारे म्हणजे मेलेली माणसे नसतात"। क्षणभर मी त्याला काहीतरी अतार्किक सांगत असल्यासारखे त्याने माझ्याकडे बघितले, आणि पटकन विचारले, "मग तारे कसे बनतात ? ते कुठून येतात ? त्यांना कुणी तयार केले ?" आता त्याला कसे समजवावे, त्याला समजेल असे कसे सांगावे ह्याचा विचार करत करत मी आणि अमोलने एकमेकांकडे पाहिले. दोघांच्याही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह !! क्षणभर विचार करून मी आशयला सांगितले, 'तुला ताऱ्यांची गोष्ट सांगू न .. तेव्हा त्यात तुला कळेल कि ते कसे बनतात, कुठून येतात, त्यांना कोण तयार करतं, इत्यादी'. गोष्ट ऐकायला मिळणार म्हणून आशय खुश झाला आणि परत टीव्ही बघू लागला.
आम्ही दोघे, मी आणि अमोल मात्र त्याच्यासाठी ताऱ्यांची गोष्ट शोधायची कुठून किंवा कशी तयार करायची ह्याचा विचार करू लागलो.