Thursday, September 22, 2011

आयुष्य हे असे
नात्यात गुंतलेले

असूनी मोकळे
 मन गुंफलेले

जाणीव असे
जीव वेढलेले

व्रत जगण्याचे
आम्ही स्वीकारलेले

Tuesday, September 20, 2011

टोमॅटो- उसळ आणि फॅमिली...

आशयची शाळा सध्या लवकर सुटत असल्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून आम्ही तिघे दुपारीही एकत्र जेवायला बसत होतो.
आज मुगाची उसळ, टोमॅटोचे काप आणि लोणचं असा बेत होता. जेवता जेवता अचानक आशयने विचारले, "मम्मा, टोमॅटो मुलगा आहे का आणि उसळ मुलगी ???". मी गोंधळले. हा असं का विचारत आहे ते कळेना. मग त्यालाच उलट प्रश्न केला, "का रे ??". त्याचे उत्तर तयारच होते. "कारण आपण तो टोमॅटो म्हणतो आणि ती उसळ. म्हणजे मग टोमॅटो मुलगा आणि उसळ मुलगी झाली ना आणि त्यांची फॅमिली !!". मला आणि अमोलला हसूच आवरेनासे झाले .. आम्ही दोघेही खो खो हसायला लागलो, तसा आशय म्हणाला, "तुम्ही एवढे जोराने का हसत आहात ??".
मग अमोलने त्याला आणखी विचारले, "मग लोणचे काय असेल ? मुलगा कि मुलगी ?" तसे आशय म्हणाला, " ते म्हणजे ते मोठे आहे ना त्यांच्या फॅमिलीमध्ये. जसे आबांना (आजोबांना) आपण ते आजोबा म्हणतो तसे". अमोलला आणि मला त्याच्या विचारशक्तीचे कौतुक वाटले. अमोलने आशयची थोडी चेष्टा करायची म्हणून आणखी विषय वाढवत त्याला विचारले, "पण तू तर आजीला 'ए आजी इकडे ये' असे म्हणतोस. ती तर तुझ्यापेक्षा मोठीच आहे ना ?". आशय लगेच उत्तरला पण मी आबांना "ओ आबा, इकडे या हो" असे म्हणतो ना !! अमोलपण रेटाने म्हणाला पण आजीला "ए आजीच म्हणतोस ना !!" या प्रश्नाचे उत्तर आशयला खरच माहित नव्हते, किंबहुना ते त्याच्या बालबुद्धीच्या आकलनापलीकडले होते.
मलाही लहानपणी माझ्या काकांनी त्यांना "ए काका" असे म्हंटल्यामुळे खूप रागावल्याचे आठवते. अगदी मला रडू येईपर्यंत त्यांनी मला सुनावले होते. तेव्हाही हा प्रश्न खूप प्रकर्षाने जाणवला होता. पण विचारायची हिम्मत मुळीच नव्हती. बरंच मोठं झाल्यानंतर कळले कि पुरुषप्रधान संस्कृती असल्याने "आजोबा, वडील, काका, यांना सगळ्यांना आदरार्थी बोलायचे आणि आजी, आई, मावशी यांना अगं, तूगं असे एकेरी बोलायचे".

Wednesday, May 11, 2011

तारे कसे बनतात?

आशयला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या.
रोज काहीतरी नवीन पाहणे, ऐकणे आणि त्यावर चर्चा करणे हा त्याचा नित्याचाच दिनक्रम झाला होता.
पाळणाघरात दिवसभर धिंगाणा घालूनही त्याची खिलाडू वृत्ती आणि खेळण्याचा उत्साह दोन्हीही, संध्याकाळपर्यंत कमी झालेले नसायचे. त्यात सध्या सुट्ट्यांमुळे सगळीच मुले दिवस भर खेळत राहत.
आज माझाही सुट्टीचा दिवस म्हणून आम्ही सर्वजण टीव्हीसमोर बसून मजेत सिनेमा पहात होतो. तितक्यात त्यातल्या एका पात्राने मरणाविषयी काहीतरी सांगितले. आशयला "मरण आणि त्यानंतर काय ?" हा प्रश्न नेहमीच पडतो. आत्तापर्यंत खूप वेगवेगळ्या प्रकाराने त्याने याविषयी विचारून, जाणून घ्यायचा प्रयत्न केला होता. पण दरवेळेस आम्ही त्याला शिताफीने हा विषय बदलून दुसऱ्या गोष्टींकडे वळवायचो.
आज त्याने अचानक तो विषय पकडला. आम्हाला तो सांगू लागला, तुम्हाला माहित आहे, "माणूस मेल्यावर आकाशात जातो आणि तारा बनतो. मी आणि अमोल (आशयचा बाबा) एकमेकांकडे पाहून चमकलोच.कारण आम्ही काहीही न सांगता हा एवढ्या विश्वासाने याविषयी बोलत आहे. आमची पण उत्सुकता ताणली गेली. मी त्याला विचारले, 'तुला कुणी सांगितले हे ? कुठल्या सिनेमात पाहिलेस का ? का टीव्हीवर कळले ?'. सगळ्या प्रश्नांना नकारार्थी मान हलवून सावकाशपणे आशय म्हणाला, "हे तर मला क्षितिजने सांगितले (हा क्षितीज म्हणजे त्याचा पाळणाघरातला, त्याच्यापेक्षा १ वर्षांनी मोठा असलेला त्याचा मित्र)". मी परत त्याला विचारले, ' पण त्याला कुणी सांगितले ?'. आशयकडे याचेही उत्तर तयार होते. तो लगेच उत्तरला, "क्षितिजला त्याच्या मम्माने सांगितले. त्याचे दादाजी /आजोबा पण देवाघरी गेलेत न, तर ते पण तारा बनले आहेत आणि रोज रात्री क्षितिजला बघतात. म्हणून तर आकाशात इतके सारे तारे आहेत. मोजता पण येत नाहीत". मला कौतुक आणि चिंता वाटली. ही एवढी एवढीशी मुले, पाळणाघरात काय काय विषयांवर गप्पा मारतात !!
मी त्याला सांगितले कि, "बाळा, माणूस मेल्यावर तारा बनत नसतो आणि तारे म्हणजे मेलेली माणसे नसतात"। क्षणभर मी त्याला काहीतरी अतार्किक सांगत असल्यासारखे त्याने माझ्याकडे बघितले, आणि पटकन विचारले, "मग तारे कसे बनतात ? ते कुठून येतात ? त्यांना कुणी तयार केले ?" आता त्याला कसे समजवावे, त्याला समजेल असे कसे सांगावे ह्याचा विचार करत करत मी आणि अमोलने एकमेकांकडे पाहिले. दोघांच्याही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह !! क्षणभर विचार करून मी आशयला सांगितले, 'तुला ताऱ्यांची गोष्ट सांगू न .. तेव्हा त्यात तुला कळेल कि ते कसे बनतात, कुठून येतात, त्यांना कोण तयार करतं, इत्यादी'. गोष्ट ऐकायला मिळणार म्हणून आशय खुश झाला आणि परत टीव्ही बघू लागला.
आम्ही दोघे, मी आणि अमोल मात्र त्याच्यासाठी ताऱ्यांची गोष्ट शोधायची कुठून किंवा कशी तयार करायची ह्याचा विचार करू लागलो.

Monday, April 18, 2011

गोष्ट न्यूटनची !!

हल्ली आशयला नवनवीन गोष्टी ऐकण्यात खूप मजा येते .. अमोलनी त्याला शास्त्रज्ञांच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली (कारण तसेही अमोलला काल्पनिक, पऱ्यांच्या, राजा महाराजांच्या कथा कधी सांगता आल्या नाहीत किंवा सांगताना आम्ही ऐकले नाही). अमोलने आशयाला आज न्युटनची गोष्ट सांगितली .. आशयने पण ती खूप मन लावून ऐकली.
आशय सारखं विचारात होता कि, "ते सफरचंद खालीच का आलं ?" असा प्रश्न त्याला पडला म्हणून तो महान शास्त्रज्ञ झाला ?? अमोलनी त्याला समजावले कि त्याने असे का होते याचा विचार करून त्याचे उत्तर शोधले म्हणून तो महान शास्त्रज्ञ झाला. न्युटनचा विचार करत आशय झोपी गेला.
दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी मला न्युटनच्या गोष्टीचा प्रत्यय आला. आशय बाथरूम मधे हात पाय धुवायला गेला होता .. तिथे त्याला वरून लोंबकळत येणारा छोटासा कोळी दिसला .. हात पाय धुणे सोडून देऊन चिरंजीव त्याचे निरीक्षण करत बसले .. बराच वेळ झाला तरी हा बाहेर कसा आला नाही म्हणून मी त्याला हाक मारली तर तंद्रीतच .. हात पाय अर्धवट धुवून आशय बाहेर आला आणि मी काही विचारणार एवढ्यात मला म्हणाला .. मम्मा ! हा कोळी वरतून खालीच का येतो ? आणि येताना तो कशाला धरून येतो ? त्याच्या जाळ्याला ?? तो असं विचार करतो का कि इथे जाळे विणु का तिथे ? कारण मी बघितले तर तो नुसताच लोंबकळतोय असे मला आधी वाटले, मम्मा !! पण मग मी हळूच जवळ जाऊन बघितले तर तो त्याच्या जाळ्याला लोंबकळत खाली येत होता आणि मला काय वाटते माहित आहे का .. तो बहुतेक विचार करत असावा कि जाळे इकडे लावू का तिकडे लावू ?? आता मला ह्याचा नीट विचार करावा लागेल, हो न मम्मा !! मला खूप हसू पण येत होते नी त्याच्या पोपटपंचीचे कौतुक पण वाटत होते. मी त्याला हसून फक्त एवढेच म्हणाले कि बघ तो कोळी आत्ता पर्यंत जाळे विणून निघून पण गेला असेल .. जा तू पण तुझे हात पाय नीट धुवून ये आणि मग, "असे का ??" ह्याचा विचार कर.
अरे !! मी तर हात पाय नीट धुतलेच नाहीत, असे म्हणून आशय परत बाथरूमकडे पळाला. मला खात्री होती कि तो आता हात पाय धुवून कोळी नक्की कुठे गेला आहे ते पाहणार, म्हणून मग हळूच त्याच्या मागे जात मी त्याचे हात पाय धुवून झाल्यावर जेव्हा तो कोळ्याला पाहण्यासाठी स्टुलावर चढला तेव्हा त्याला म्हणाले कि मी मागेच आहे आशय !! जीभ चावून गोड हसत आशय बाहेर आला. गम्मत म्हणजे तो अजूनही "कशाचा विचार करावा" ह्याचे उत्तर शोधत आहे !! --