Wednesday, May 11, 2011

तारे कसे बनतात?

आशयला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या.
रोज काहीतरी नवीन पाहणे, ऐकणे आणि त्यावर चर्चा करणे हा त्याचा नित्याचाच दिनक्रम झाला होता.
पाळणाघरात दिवसभर धिंगाणा घालूनही त्याची खिलाडू वृत्ती आणि खेळण्याचा उत्साह दोन्हीही, संध्याकाळपर्यंत कमी झालेले नसायचे. त्यात सध्या सुट्ट्यांमुळे सगळीच मुले दिवस भर खेळत राहत.
आज माझाही सुट्टीचा दिवस म्हणून आम्ही सर्वजण टीव्हीसमोर बसून मजेत सिनेमा पहात होतो. तितक्यात त्यातल्या एका पात्राने मरणाविषयी काहीतरी सांगितले. आशयला "मरण आणि त्यानंतर काय ?" हा प्रश्न नेहमीच पडतो. आत्तापर्यंत खूप वेगवेगळ्या प्रकाराने त्याने याविषयी विचारून, जाणून घ्यायचा प्रयत्न केला होता. पण दरवेळेस आम्ही त्याला शिताफीने हा विषय बदलून दुसऱ्या गोष्टींकडे वळवायचो.
आज त्याने अचानक तो विषय पकडला. आम्हाला तो सांगू लागला, तुम्हाला माहित आहे, "माणूस मेल्यावर आकाशात जातो आणि तारा बनतो. मी आणि अमोल (आशयचा बाबा) एकमेकांकडे पाहून चमकलोच.कारण आम्ही काहीही न सांगता हा एवढ्या विश्वासाने याविषयी बोलत आहे. आमची पण उत्सुकता ताणली गेली. मी त्याला विचारले, 'तुला कुणी सांगितले हे ? कुठल्या सिनेमात पाहिलेस का ? का टीव्हीवर कळले ?'. सगळ्या प्रश्नांना नकारार्थी मान हलवून सावकाशपणे आशय म्हणाला, "हे तर मला क्षितिजने सांगितले (हा क्षितीज म्हणजे त्याचा पाळणाघरातला, त्याच्यापेक्षा १ वर्षांनी मोठा असलेला त्याचा मित्र)". मी परत त्याला विचारले, ' पण त्याला कुणी सांगितले ?'. आशयकडे याचेही उत्तर तयार होते. तो लगेच उत्तरला, "क्षितिजला त्याच्या मम्माने सांगितले. त्याचे दादाजी /आजोबा पण देवाघरी गेलेत न, तर ते पण तारा बनले आहेत आणि रोज रात्री क्षितिजला बघतात. म्हणून तर आकाशात इतके सारे तारे आहेत. मोजता पण येत नाहीत". मला कौतुक आणि चिंता वाटली. ही एवढी एवढीशी मुले, पाळणाघरात काय काय विषयांवर गप्पा मारतात !!
मी त्याला सांगितले कि, "बाळा, माणूस मेल्यावर तारा बनत नसतो आणि तारे म्हणजे मेलेली माणसे नसतात"। क्षणभर मी त्याला काहीतरी अतार्किक सांगत असल्यासारखे त्याने माझ्याकडे बघितले, आणि पटकन विचारले, "मग तारे कसे बनतात ? ते कुठून येतात ? त्यांना कुणी तयार केले ?" आता त्याला कसे समजवावे, त्याला समजेल असे कसे सांगावे ह्याचा विचार करत करत मी आणि अमोलने एकमेकांकडे पाहिले. दोघांच्याही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह !! क्षणभर विचार करून मी आशयला सांगितले, 'तुला ताऱ्यांची गोष्ट सांगू न .. तेव्हा त्यात तुला कळेल कि ते कसे बनतात, कुठून येतात, त्यांना कोण तयार करतं, इत्यादी'. गोष्ट ऐकायला मिळणार म्हणून आशय खुश झाला आणि परत टीव्ही बघू लागला.
आम्ही दोघे, मी आणि अमोल मात्र त्याच्यासाठी ताऱ्यांची गोष्ट शोधायची कुठून किंवा कशी तयार करायची ह्याचा विचार करू लागलो.

Monday, April 18, 2011

गोष्ट न्यूटनची !!

हल्ली आशयला नवनवीन गोष्टी ऐकण्यात खूप मजा येते .. अमोलनी त्याला शास्त्रज्ञांच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली (कारण तसेही अमोलला काल्पनिक, पऱ्यांच्या, राजा महाराजांच्या कथा कधी सांगता आल्या नाहीत किंवा सांगताना आम्ही ऐकले नाही). अमोलने आशयाला आज न्युटनची गोष्ट सांगितली .. आशयने पण ती खूप मन लावून ऐकली.
आशय सारखं विचारात होता कि, "ते सफरचंद खालीच का आलं ?" असा प्रश्न त्याला पडला म्हणून तो महान शास्त्रज्ञ झाला ?? अमोलनी त्याला समजावले कि त्याने असे का होते याचा विचार करून त्याचे उत्तर शोधले म्हणून तो महान शास्त्रज्ञ झाला. न्युटनचा विचार करत आशय झोपी गेला.
दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी मला न्युटनच्या गोष्टीचा प्रत्यय आला. आशय बाथरूम मधे हात पाय धुवायला गेला होता .. तिथे त्याला वरून लोंबकळत येणारा छोटासा कोळी दिसला .. हात पाय धुणे सोडून देऊन चिरंजीव त्याचे निरीक्षण करत बसले .. बराच वेळ झाला तरी हा बाहेर कसा आला नाही म्हणून मी त्याला हाक मारली तर तंद्रीतच .. हात पाय अर्धवट धुवून आशय बाहेर आला आणि मी काही विचारणार एवढ्यात मला म्हणाला .. मम्मा ! हा कोळी वरतून खालीच का येतो ? आणि येताना तो कशाला धरून येतो ? त्याच्या जाळ्याला ?? तो असं विचार करतो का कि इथे जाळे विणु का तिथे ? कारण मी बघितले तर तो नुसताच लोंबकळतोय असे मला आधी वाटले, मम्मा !! पण मग मी हळूच जवळ जाऊन बघितले तर तो त्याच्या जाळ्याला लोंबकळत खाली येत होता आणि मला काय वाटते माहित आहे का .. तो बहुतेक विचार करत असावा कि जाळे इकडे लावू का तिकडे लावू ?? आता मला ह्याचा नीट विचार करावा लागेल, हो न मम्मा !! मला खूप हसू पण येत होते नी त्याच्या पोपटपंचीचे कौतुक पण वाटत होते. मी त्याला हसून फक्त एवढेच म्हणाले कि बघ तो कोळी आत्ता पर्यंत जाळे विणून निघून पण गेला असेल .. जा तू पण तुझे हात पाय नीट धुवून ये आणि मग, "असे का ??" ह्याचा विचार कर.
अरे !! मी तर हात पाय नीट धुतलेच नाहीत, असे म्हणून आशय परत बाथरूमकडे पळाला. मला खात्री होती कि तो आता हात पाय धुवून कोळी नक्की कुठे गेला आहे ते पाहणार, म्हणून मग हळूच त्याच्या मागे जात मी त्याचे हात पाय धुवून झाल्यावर जेव्हा तो कोळ्याला पाहण्यासाठी स्टुलावर चढला तेव्हा त्याला म्हणाले कि मी मागेच आहे आशय !! जीभ चावून गोड हसत आशय बाहेर आला. गम्मत म्हणजे तो अजूनही "कशाचा विचार करावा" ह्याचे उत्तर शोधत आहे !! --

Tuesday, July 27, 2010

झाड कसे बनते मम्मा ?

संध्याकाळचा चहा घेत मी आणि आशय बाल्कनीत गप्पा मारत बसलो होतो. समोरच्या झाडाकडे पाहत आशयने विचारले,"मम्मा झाड कसे बनते ?
मी आशयला विचारले,'तूला काय वाटते सांग पाहू ?'
मग आशय मोठे मोठे डोळे करून म्हणाला,"छोट्या झाडापासून ! पण मम्मा छोटे झाड कसे बनते ? पुढच्या सगळ्या संभाव्य प्रश्नांचा अंदाज येऊन आशयला झाडाच्या निर्मितीची पूर्ण प्रक्रिया सांगणे मला गरजेचे वाटले.
मी म्हणाले,'आशय तू वेग-वेगळ्या, छोट्या छोट्या झाडाच्या बिया पाहिल्या आहेस न (आजी आबा आणि आत्यासोबत बागेत थोडेफार काम केले असल्याने याची माहिती आशयला होतीच), त्या मातीत लावून त्यांना व्यवस्थित पाणी दिले, त्यांची काळजी घेतली न कि त्याचे छोटे रोप बनते मग ते रोप वाढत वाढत मोठे होऊन त्याचे झाड तयार होते'.
झाडाकडे पाहून झाल्यावर, माझ्या कडे पहात पहात माझ्यामागे असलेल्या खिडकीकडे सहजपणे पाहत आशयने परत विचारले, "अच्छा! आणि मम्मा ही खिडकी कशी बनते ?"
त्याच्या चिकित्सक वृत्तीचे मला हसू आले, पण ते त्याला जाणवू न देता मी शान्तपणे उत्तरले, 'ही खिडकी न, झाडाच्या लाकडापासून तयार होते '.
"पण मम्मा ती तयार कशी होते आणि कोण करतं ?" आशयने परत विचारले.
मी त्याला म्हणाले ,'झाड मोठे झाल्यावर त्याला कापून, त्याच्या लाकडापासून फळ्या तयार करतात आणि त्या फळ्या एकमेकाला जोडून त्यापासून खिडकी बनवतात आणि हे सगळे माणसेच करतात'.
खिडकीकडे नी झाडाकडे आळीपाळीने निरखून पाहात परत एकदा आशयने विचारले,"मम्मा हा रंग पण झाडावरच तयार होतो का जो खिडकीला लावलेला असतो ?"
आता मात्र मला हसू आवरता आले नाही. मी हसून त्याला म्हणाले, 'तुला काय वाटते हा रंग झाडावर तयार होऊ शकतो का ?'
आशय पण हसून म्हणाला "का ? होऊ शकत नाही का ?".
मग मी पण त्याची थोडी मजा घ्यायची ठरवली. मी त्याला म्हणाले, 'मग सांग बरे .. कोणकोणत्या झाडाचे खोड रंगीत असते ते ?'.
आशय पण तितक्याच खोडकरपणे म्हणाला,"मी अजून तरी कुठे रंगीत खोड नाही पाहिले मम्मा !!"
मग लाडात एक रट्टा मारत मी त्याला म्हणाले, 'तू सांग हा रंग कोणी दिला असेल या खिडकीला ते ?'
लबाड मुलगा लगेच उत्तरला,"रंग देणाऱ्या काकांनी. पण मम्मा, हा रंग तयार कोणी केला ? आपल्याला तयार करता येईल का ?".
आशयला रंग तयार करण्याची प्रक्रिया कशी सांगावी, त्याला काय उत्तर द्यावे याचा विचार करत असतानाच मनात एक विचार आला,"प्रश्नांची किती अखंड विचारशृंखला असते ह्याच्या डोक्यात !!".
तितक्यात दारावरची बेल वाजल्याने स्वारीने तिकडे धूम ठोकली आणि आमची प्रश्नमोहीम तिथेच थांबली.

Monday, July 12, 2010

शंकरबाप्पाने हे फार वाइट काम केले !!!

रोजच्या सारखी घाई गडबड नाही हे बघून आशयने मला विचारले, 'मम्मा आज सुट्टी आहे ? आज रविवार आहे ?' माझे 'हो' असे उत्तर ऐकून स्वारी धूम बैठकीत पळाली. रिमोट घेउन लगेच TV समोर बसली. मला लगेच सांगून झाले, कि आज सुट्टी आहे न ... म्हणून मी मला जे पाहिजेत ते - माझे प्रोग्राम बघणार. लगेच त्याच्या cartoon network चे channel लावले गेलेसुद्धा. पण तिथे त्याला हवा असलेला "मारुती मेरा दोस्त" सिनेमा संपत आला होता. तो पाहून झाल्यानंतर लगेच स्वारी हिरमुसली.
मी त्याच्या मर्जीविरुद्ध त्याच्याकडून रिमोट घेऊन कुठे कुठे काय काय कार्यक्रम लागले आहेत ते पाहत होते. एका ठिकाणी "बाल गणेश" हा सिनेमा लागला होता. मग लगेच माझ्या हातातून रिमोट घेऊन आशय मला म्हणाला "Thank you मम्मा". थोडक्यात मला सांगण्यात आले होते कि आता तू जाऊ शकतेस. मी पण मग फार विचार न करता माझ्या कामाला लागले.
थोड्या वेळाने सिनेमा कुठपर्यंत आला आहे, हे बघण्यासाठी म्हणून मी बैठकीत आले. तर आशय मला म्हणाला, "मम्मा, शंकर बाप्पाने हे फार वाइट काम केले". क्षणभर मला काही कळलेच नाही कि आशय अस का म्हणत आहे. त्याच्याजवळ बसत मी त्याला विचारले, "कसले वाइट काम बेटा ?". मग हळूच त्याने TV कडे बोट दाखवले. तरी मला काही कळेना. TV वर सिनेमामध्ये गणेश (गजमुख असलेला) खेळत होता.
मी परत भुवया उंचावून त्याला विचारले. मग पट्ठ्याने सांगायला सुरुवात केली. "मम्मा, शंकर बाप्पाने आधी गणेश बाप्पाचे ऐकले नाही. एवढ्याशा गणेश बाप्पासमोर शंकर बाप्पा खूप खूप नाचला आणि शेवटी त्रिशुळाने त्याला मारून त्याचे डोके उडवले. मग त्याला जिवंत करण्यासाठी बिचाऱ्या हत्तीणीच्या छोट्याशा पिल्लाला मारून टाकले आणि त्याचे डोके गणेश बाप्पाला लावले. आणि बाकी बरेच देवबाप्पा पण तिथे होते, ते पण कुणीच काही म्हणाले नाही. हे शंकर बाप्पाने फार वाइट काम केले मम्मा !! त्या बिचाऱ्या हत्तीला बोलता येत नव्हते म्हणून काय त्याला मारायचे ? छे !!". क्षणभर मला पुढे काय बोलावे हेच कळेना. शिवाय इतक्या वर्षापासून आपण ही कथा ऐकत आहोत पण आपल्याला हा मानवीय दृष्टीकोन कसा जाणवला नाही ह्याची शरम पण वाटली.
मी काहीच प्रतिक्रिया देत नाहीये हे लक्षात येऊन आशयने मला माझे मत विचारले. प्रामाणिकपणे मी पण त्याच्या मताला दुजोरा देत 'शंकर बाप्पाने असे करायला नको होते' अशी कबुली दिली.
त्याक्षणी मला आशयच्या हळव्या स्वभावाचा आणखी एक पैलू जाणवला. 'मुक्या प्राण्यांवर दया करावी, त्यांना उगीचच त्रास देऊ नये ' हे पूर्वी कधीतरी सांगितलेले, त्याच्या मनात इतके खोलवर रुतले असेल ह्याची मला जाणीवच नव्हती.
तितक्यात आशयने परत मला हाक मारून माझे लक्ष वेधले. 'गणेशबाप्पा त्याच्या भूषकाला लाडू का देत नाहीये ?' असे त्याने विचारले. मी म्हणाले कोणाला? परत तो उत्तरला "भूषकाला". मी हसून त्याला म्हणाले, 'बेटा त्याला 'भूषक' नाही तर 'मूषक' म्हणतात आणि गणेश बाप्पा त्याची गम्मत करत असेल. ते दोघेजण मित्र आहेत न मग मित्राने मित्राची गम्मत केली तर चालते न!'. "हो" म्हणत स्वारी पुन्हा 'बाल गणेश' पाहण्यात गुंग झाली.
मी पण आशयच्या व्यक्तिमत्वाचा एक नवा पैलू समजला, ह्या आनंदात कामाला लागले.

Thursday, July 8, 2010

SMS कसा येतो बाबा ?

आज काल मोबाईलचा होत असलेला सर्रास वापर मुलांवर, त्यांच्या वैचारिक क्षमतेवर किती वेग-वेगळ्या पद्धतीने परीणाम करतो हे त्यांचे प्रश्न ऐकूनच जाणवते.
ऑफिस मधून येऊन नुकतीच चहा करत होते. अमोल (आशयचा बाबा) स्वयंपाक घरात उभा राहून माझ्याशी गप्पा मारत होता. आशय खेळायला चल म्हणून हट्ट करत होता. त्याला सांगितले की चहा झाला की पिउन लगेच तुझ्यासोबत खेळायला येते, तोपर्यंत तू खेळण्याची तयारी कर. दोनच मिनिटांनी स्वारी परत बाबासमोर उभी. मला वाटले आता तो बाबाला खेळायला चल म्हणेल .. पण त्याच्या चेहरयावर फार वेगळ्या छटा दिसल्या. मी आणखी काही विचार करणार तेवढ्यात त्याचा बाबाला विचारलेला प्रश्न कानी पडला.
त्याने बाबाला विचारले "बाबा SMS कसा येतो आपल्या मोबाईलमध्ये ?"
मला मोठ्ठा प्रश्न पडला कि आता ह्याला सगळे तंत्र कसे समजावयाचे ? पण तोपर्यंत बाबाने त्याला उत्तर सांगायला सुरुवात केली होती.
बाबा त्याला म्हणाला "आशय मोबाईलच्यामागे battery आणि जे Sim card असते न त्यामुळे SMS येऊ शकतो, आणि आपण पण SMS पाठवू शकतो, पण ती battery charged असली पाहिजे आणि Sim card चालू असले पाहिजे."
(आत्तापर्यंत मोबाईल (बंद पडलेले) बऱ्यापैकी खेळायला मिळाल्याने battery म्हणजे काय ? battery charge करावी लागते, नाहीतर मोबाईल बंद पडतो, signal नसले कि फोन कट होतो वगैरे वगैरे, हे सर्व आशयला माहित झाले होते).
"बाबा म्हणजे battery च्या खाली जे पांढरे पांढरे छोटेसे असते, जे तू काढतोस आणि परत घालतोस, त्याला Sim card म्हणतात का ?" आशयने विचारले".
"हो" बाबा उत्तरला.
"अच्छा, म्हणजे तुम्ही मला जो मोबाईल खेळायला दिला आहे त्यातली battery चार्ज नाही आणि त्यातले Sim कार्ड पण चालू नाही, हो न ??"
मला अगदी मनातून हसू आले नि कौतुक पण वाटले, कि किती लवकर आशयने त्याला दिलेल्या मोबाईलची अवस्था आणि उपयोग होऊ शकत नाही हे ओळखले होते.
लगेच त्याने बाबाला विचारले, "तुझा आणि मम्माचा मोबाईल चालू आहे न ? मग तुम्ही मला 'चालू असलेला' मोबाईल कधी देणार ?"
मी बाबाकडे आता हा काय उत्तर देणार म्हणून हसत हसत बघत होते. बाबा तेवढ्याच संयमाने आशयला म्हणाला कि तू बारावी पास झालास न कि तुला छानसा मोबाईल मी घेऊन देइन.
कधीतरी आपल्याला आपला - चालू स्थितीतला मोबाईल मिळणार या गोष्टीवर खुश होऊन आशयची स्वारी खेळायला पळाली.
मी आणि बाबा आशयच्या चिकित्सक वृत्तीबद्दल कौतुकाने एकमेकांकडे पाहत राहिलो.

Thursday, June 24, 2010

सिनेमा आणि आशय

"वळू" हा आशयचा अतिशय लाडका सिनेमा. त्यातील बैलाने पूर्ण गावाची उडवलेली तारांबळ पाहताना आशय जाम एन्जोय करत असतो. त्यातले "Forest म्हणजे स्वानंद गड्डमवार" हे पात्र त्याचे खास लाडके. आशय त्यांना गड्डमवार काका म्हणतो. मग त्यांचे बोलने, चालणे एवढेच काय रागावणेदेखील जशास तसे रोजच्या व्यवहारात वापरतो. शिवाय त्याची इतरांनी नोंद घ्यावी हि देखील त्याची विशेष मागणी असते. चुकून एखादे वेळेस दुर्लक्ष केले तर तो स्वतःहून त्याची आठवण करून देतो अन्यथा परत सगळे रिपीट करतो. तर असे हे आशयचे सिनेमाचे भुत किंवा सिनेमाप्रेम एवढेच मर्यादित न राहता आता ते सर्वच गोष्टींच्या हुबेहूब अनुकरणातून येत होते, जे थांबवणे अतिशय गरजेचे बनले होते.
मग बाबांनी सुरुवात गड्डमवार काका यांच्यापासून केली. बाबा आशयला सांगत होता, म्हणजे प्रयत्न करत होता कि सिनेमातले कोणतेही पात्र खरे नसते (बाबाला लगेच जाणवले कि आता हा 'पात्र म्हणजे काय?' ते विचारणार) म्हणून लगेच बाबाने सावरले कि काम करणारे कोणीही खरे नसून ते फक्त त्या सिनेमापुरते नाटक करत असतात.
जसे तुम्ही तुमच्या शाळेत सगळ्यांनी मिळून एका गाण्यात वेगळे वेगळे ड्रेस घालून गाणे म्हणले होते ... कोणी झाड झाले होते, कोणी जोकरचा ड्रेस घालून जोकर बनले होते, एक मुलगी परी बनली होती ...
आशयने लगेच पुढचा प्रश्न विचारला 'बाबा, परी म्हणजे काय ?'.
मग बाबा उत्तरला 'बेटा, पंख लावलेली मुलगी म्हणजे परी '
लगेच बालमनात पुढचे प्रश्न तयार .. 'पण बाबा तिला पंख कुठून आले ? कसे आले ? ती उडू शकते ? मी पंख लावले तर उडू शकेन ?'
आता नवीनच आव्हान बाबासमोर उभे होते ??
बाबा म्हणाला 'अरे बेटा फुलपाखराला असतात न तसे पंख पण खोटे खोटे तिने लावले रे ज्यामुळे उडता येत नसते... ते लावून ती मुलगी परी असल्याचे नाटक करते रे .. गड्डमवार काकासारखे .. कशीबशी गाडी ज्या रुळांवरून जात होती तिकडे आली .. पण आशयचा मेंदू थोडाच तसे होऊ देणार होता. लगेच पुढचा प्रश्न आला .. 'बाबा नाटक म्हणजे काय रे ?'
मग बाबा उत्तरला 'आपण कोणतीही गोष्ट गम्मत म्हणून थोडा वेळच करतो न ! त्याला नाटक म्हणतात. तू नाही का कधी कधी रडायचे नाटक करतोस !!'
आशयने लगेच गालातल्या गालात हसून प्रतिसाद दिला. मग बाबाने परत त्याची सिनेमाची गाडी पुढे दामटली.
बाबा त्याला समजावून सांगू लागला कि गड्डमवार काकांचे खरे नाव अतुल कुलकर्णी आहे आणि त्यांनी कधीच वळू पकडलेला नाही. पण या सिनेमामध्ये ते आणि त्यांच्यासोबतचे सर्वजण वळू पकडण्याचे नाटक करत असतात. एवढेच काय तो वळू पण खरा नसतो. तो पण एका काकांच्या शेतात काम करणारा बैल आहे.
"बाबा खरच !!!" आशयने विचारले. बाबावर श्रद्धा असल्याने अविश्वास पण दाखवता येत नव्हता आणि इतक्या दिवसांचे असलेले गड्डमवार काका खरे नाहीत ह्यावर विश्वास पण बसत नव्हता आणि गम्मत म्हणजे हे सगळे स्पष्टपणे त्याच्या चेहऱ्यावर आम्ही वाचू शकत होतो. मग बाबा आशयला जवळ घेऊन म्हणाला, 'बेटा, आपण जेव्हा अतुलकाकांना भेटू न, तेव्हा हे खरे आहे कि नाही ते तूच त्यांना विचार.'
आशयला थोडेसे बरे वाटले कि बाबा आपल्याला थेट अतुलकाकालाच विचारायची संधी देणार आहे. पण लगेच बालमनात प्रश्न उपस्थित झाला... आशय म्हणाला 'बाबा आपण खरच अतुलकाकांना भेटायचे आहे ? ते लातूरला येणार आहेत कि गांधीनगरला ? कि आपणच त्यांच्या गावाला जायचे आहे ? पण ते कोणत्या गावाला राहतात ?'. मग बाबा म्हणाला ते आपण त्यांच्याशी बोलून ठरवू या. त्यांना कधी रिकामा वेळ आहे ते बघून आपण त्यांना भेटू. आशयने वेळ न दवडता विचारले "पण बाबा तुम्ही तर सोबत असाल न माझ्या ??"

"किती ही निरागसता आशयच्या बालमनाची !!!"
अशा रीतीने सिनेमाचे भूत काही अंशी का होइना पण उतरले खरे.

Tuesday, June 15, 2010

कडू कडू कारले

बरेच दिवसात कारल्याची भाजी केली नव्हती म्हणून यावेळेस मुद्दाम कारले आणले होते. भाजी चिरायला घेतली तेव्हा आशय तिथेच बसला होता. बराच वेळ माझ्या शेजारी बसून तो निरीक्षण करत होता. विचार करून थोड्या वेळाने कारले बघून त्याची प्रतिक्रिया आली .. "मम्मा मला कारल्याची भाजी आवडत नाही". मी नेहमीप्रमाणे त्याला उत्तरले, "बाळा, तुला माहित आहे का !! कारले खाल्ल्याने काय होते ??? क्षणाचाही विलंब न करता तो उत्तरला "हो !! माहित आहे .. ताकद येते "... आता मला जरा विचार करूनच उत्तर देणे भाग होते. कारण नेहमी ताकद आणि strong होणे या दोन्ही गोष्टी त्याला चांगल्याच पाठ झाल्या होत्या. मी क्षणभर विचार करत होते. लगेच आशय म्हणाला, 'सांग न मम्मा ..काय होते ??' विचार करून मी त्याला म्हणाले, कि ताकद तर येतेच शिवाय आपले पोट पण छान राहते (काही तरी बोलून वेळ मारून नेणे मला भाग होते). परत त्याची चौकस बुद्धी जागरूक झाली. मला लगेच पुढच्या प्रश्नाला सामोरे जायचे होते ... 'कस काय ग मम्मा ??'. आता माझी खरी परीक्षा होती. वेळ मारून नेली तर परत कधी तरी आत्ता सांगितलेल्या उत्तराबद्दल चौकशी होणार हे नक्की. तरीही ढाल हातात घेऊन मी मैदानात उतरले. विचार करत आशयला विचारले, 'बाळा कारल्याची चव कशी असते?' आशु उत्तरला "उम्म्म !! कडू कडू". मी म्हणाले आशय कडू रस जो असतो न तो आपले पोट साफ करतो. आपण घेतो ते औशध कसे कडूच असते न .. ते आपल्याला आवडते का ? (माझी साधी अपेक्षा कि तो नाही म्हणूनच उत्तरेल पण छे !!) आशय म्हणाला मम्मा मला तर औशध घ्यायला आवडते .. (माझ्या डोक्यात तारे चमकले) मी म्हणाले "बाळा तुला आवडते पण बाकीच्यांचे काय? सगळेजण आवडीने औशधे खातात का ? नाही न !!" तसेच तुला कारले आवडत नसले तरी ते खायचे असते.
एवढ्या वेळ केलेल्या मशक्कतनंतर कसेबसे बाळराजांनी हो म्हंटले आणि कारले खायला नावडीने का होईना पण होकार भरला !! ..
हुश्श् !!!