Sunday, June 29, 2014

विशेष म्हणजे

आशय चे बालपण कधीच संपू नये असे वाटत राहते पण हे वाटणे किती अयोग्य आहे ह्याची जाणीव झाली कि हसायला येते. 

आशु मोठा होत आहे. त्याच्या विचाराच्या कक्षा रुंदावत चालल्या आहेत ह्याची जाणीव परवाच्या चर्चेतून झाली …. 
माझे आणि अमोलचे त्याने नुकतेच केलेल्या बेसनाच्या लाडवावरून चर्चा चालली होती. अमोल माझ्याकडेच माझी तक्रार करत होता कि मी त्याच्या उत्तम बनलेल्या लाडूंबद्दल "चांगली" प्रतिक्रिया दिली नाही म्हणून …. मी पण त्याला त्याच्याच नेहमीच्या अंदाजात उत्तर दिले, 'मी ते लाडू खाल्ले न ! म्हणजेच ते चांगले झाले आहेत. आणि तू कुठे बाकीच्या मैत्रिणींच्या नवऱ्याप्रमाणे डिशेस करतोस?'. तितक्यात आशु तिथे आला त्याने अमोलला विचारले, 'काय चालले आहे?'; अमोलने इतिवृत्तांत सांगितला. आणि पुढे म्हणाला "विशेष म्हणजे हि माझी मिसेस, मी करत नाही स्पेशल डिशेस". 
त्यावर आशु अमोलकडे बघून गालातल्या गालात हसला. अमोलने त्याला विचारले, "काय झाले बाळ ? काय विचार केलास?". आशय उत्तरला, " विशेष म्हणजे हि माझी मिसेस, मी करत नाही स्पेशल डिशेस … मी देतो हिला किसेस"
आम्ही दोघेही आवाक !!

Saturday, June 22, 2013

रक्तगट ओळखायचा कसा ?

बऱ्याच दिवसांनी आम्हा तिघांच्या गप्पा जेवताना रंगात आल्या होत्या. जेवता जेवता आशय आम्हाला कोडी घालत होता. आशयची आत्या त्याच्या पुस्तकांना कव्हर घालत होती. तिने अमोलला आशयच्या 'स्कुल डायरी' लिहिण्याबद्दल आठवण करून दिली. त्यावरून गप्पा "रक्तगट" विषयावर आल्या.
अमोलने आशयला गांधीनगरची रक्तगटाच्या टेस्टची आठवण लक्षात आहे का ? विचारताच त्याने बोलणे सुरु केले. आशय म्हणाला,"हो बाबा ! आपण त्या लैबमध्ये गेलो होतो नि तू मला अचानक 'आशय तिकडे बघ ते काय आहे !' असे म्हणालास (हावभावासहित) अन मी बघेपर्यंत त्या काकांनी माझे रक्त काढले पण !!".    
बाबाने पुढे विचारले "तुझा रक्तगट काय आहे आशय ?" (प्रश्न त्याची परीक्षा घेण्यासाठी होता, हे लक्षात न आल्याने) मी लगेच उत्तरले "AB+ve" . तात्काळ आशय चिडून म्हणाला," काय ग मम्मा ? मला उत्तर द्यायचे होते, तू का दिलेस ?"
मी सावरासावर करीत म्हणाले," अरे ! मी माझा रक्तगट सांगितला, तुझा नाही . (A) ए ! B+ve !" . लेकराने विश्वास ठेवला माझ्यावर नि म्हणाला," अच्छा ! तुझा B+ve आहे का ? माझा तर AB+ve आहे" . मी म्हणाले "बाबाचा पण !!" लगेच आत्या आशयला म्हणाली, " आशय, माझा पण !!"
अमोलने त्याच्या ज्ञानात भर घालण्यासाठी त्याला इतर माहिती सांगण्यास सुरुवात केली," तुला माहिती आहे का बाळा ? एकुण चार मुख्य रक्तगट आहेत आणि प्रत्येकाचे दोन उपगट, +ve आणि -ve, असे एकुण आठ ! सगळी माणसे यापैकीच कोणत्या ना कोणत्या रक्तगटाची असतात. त्यातही O -ve हा रक्तगट फार कमी लोकांचा असतो". 
अमोलचे सांगणे संपत नाही तोपर्यन्त आशयने विचारले," हा रक्तगट कसा काय ओळखतात ? आणि कोण सांगतं की तुमचा 'हा' रक्तगट आहे आणि तोच का असतो ?"
मी नि अमोल, दोघांनीही एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. दोघांच्याही मनात एकच प्रश्न 'आता उत्तर काय द्यायचे ? कसे सांगायचे ?'. मी कौतुकाने आशयकड़े बघत अमोलला हसून म्हणाले,"द्या गोवंडे, उत्तर द्या !". यावर लगेच आशय अमोलला थांबण्याची खुण करत म्हणाला,"नाही गोवंडे तुम्ही थांबा ! (माझ्याकडे बघत) कुलकर्णी तुम्ही उत्तर द्या !!". (अमोल खदखदुन हसत होता).
मी मनातून हसून विचार करत आशयला बोलू लागले, (इकडे अमोलच्या हात गोल फिरवून लपेटल्याच्या खुणा करणे सुरु होते. शेवटी ते बघून हसत हसत त्याला थांबायला सांगत मी आशुला म्हणाले," बाळा त्यासाठीच आपल्याला blood test करावी लागते. मग आपल्याला कळते की आपला रक्तगट काय आहे ते !"
आशय - "हो ग मम्मा, पण तेच (हा मुख्य प्रश्न बरं का); त्या टेस्टने कसे कळते ?"
मी नि अमोल, दोघांनीही एकमेकांकडे बघितले, डोळ्यात एकच प्रश्न होता दोघांच्याही ! "किती मोठी पंचाईत ? कसे समजावयाचे आता हे सगळे ?"
थोडा विचार करून मी म्हणाले (तोपर्यंत आशय प्रश्नार्थक नजरेने मला न्याहाळतच होता) ,"जसे आपण एखादे झाड कशाचे आहे हे आपण त्याच्या पान, फुल अथवा फळावरून ओळखतो; तसेच रक्ताची टेस्ट केल्यावर कळु शकते तो कोणता रक्तगट आहे ते !". त्यावर लगेच आशय म्हणाला,"पण झाडाला असलेल्या फुलं नि फळांवरुन आपल्याला ते कळते नं ! मग रक्तगटाचे कसे ?" मी नि अमोल दोघेही उत्तरलो," असे थोडीच असते ? झाडांच्या पानांवरुनही आपण ओळखू शकतो नं ! जसे आंब्याचे झाड आपल्याला कधीही ओळखू येते, त्याच्या पानांवरून; पावसाळयात किंवा हिवाळयात, तेव्हा कुठे त्याला मोहर किंवा आंबे लागलेले असतात ? तसेच रक्तगटाचे देखील असते !!".
एवढ्या स्पष्टीकरणानंतर साहेबांना पटले की अशी काही टेस्ट / क्रिया असू शकेल की ज्यावरून आपण ओळखून सांगू शकू कुणाचा कोणता रक्तगट आहे हे !!.

Wednesday, May 9, 2012

संस्कार - सुविचार

संस्कार माणसाच्या मनावर खूप खोलवर परिणाम करून जात असतात.
आज सहज मला आलेल्या इमेलमधे खालील विचार वाचण्यात आले आणि मन एकदम १५-१७ वर्ष मागे गेलं.
"सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे. ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही."
सातवीत असताना शाळेत रोज मोठ्या फळ्यावर लिहिलेला सुविचार लिहिणे बंधन कारक होते एवढेच नव्हे तर त्यासाठी वेगळी/ स्वतंत्र वही आम्हाला घालावी लागत असे, नी ती नियमितपणे तपासली पण जात असे. त्यामुळे ती नीट नेटकी ठेवणे, त्या वहीत सुविचार सुवाच्य अक्षरात लिहिणे ह्या गोष्टी ओघाने आल्याच. आम्हाला तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी खूपच त्रासदायक वाटायच्या .. खेळण्याच्या नादात एखादे दिवशी नेमके सुविचार लिहिणे राहून जायचे नी दुसऱ्या दिवशी हमखास वही तपासलीच जायची. मग वैताग वाटायचा असल्या गोष्टींचा ! वाटायचे काय फरक पडतो ह्या सुविचारांनी आणि ते लिहून ठेवल्याने .. आहे ते आयुष्य थोडेच बदलते ह्यामुळे..
पण जसजसे आयुष्य व्यतीत व्हायला लागले तसतसे शाळेत लिहिलेल्या सुविचारांनी मनाला एक प्रकारचे धैर्य तर मिळालेच शिवाय कठीण परिस्थितीत मार्गदर्शनही !! तेव्हाचा थोडासा त्रास नंतर आयुष्यभरासाठी सुसह्य परिस्थिती निर्माण करण्याचे काम करत होता, अवघड वळणावर योग्य निर्णय घेणे, तोल ढळू न देणे हे त्यामुळेच घडले. 
काही गोष्टींची किंमत वेळ आल्यावरच कळते हे बाकी खरेच; मग त्यात संस्कारही आलेच !!

Thursday, April 26, 2012

आज बरेच दिवसांनी आम्ही एकत्र गप्पा मारत टीव्ही बघत होतो. लाडका कार्यक्रम "सा रे ग म प" चालू होता. सूत्रधाराने त्यातल्या एका स्पर्धकासोबत ती करत असलेल्या एका चित्रपटाबद्दल चर्चा सुरु केली. त्यावरून आशयच्या डोक्यात नेहमीप्रमाणे प्रश्न उपस्थित झाला नी त्याने आम्हाला किंबहुना अमोलला एक प्रश्न विचारला.
आशय म्हणाला,"बाबा,  मम्माचे लग्नापूर्वीचे नाव 'अपर्णा कुलकर्णी' होते ना ? तुझ्याशी लग्न झाल्यावर ते 'अपर्णा गोवंडे' असे झाले ना ?" अमोलने होकार दिला.
क्षणभर विचार करून आशयने लगेच दुसरा प्रश्न विचारला (जो मला अगदी अपेक्षित होता, किंबहुना मी त्याचीच वाट पहात होते)  
मग बाबा तुझे लग्नापूर्वीचे नाव काय होते ?अमोल गोवंडेच होते का ?" आता मात्र मला हसू आवरणे कठीण होत होते आणि अमोलची गोची होत होती (जी त्याच्या चेहऱ्यावर दिसत असूनसुद्धा तो लपवण्याचा प्रयत्न करत होता).
हसू आवरण्याचा प्रयत्न करत अमोल आशयला काय सांगावे ह्याचा विचार करू लागला. 
मला खूपच मजा वाटत होती, शिवाय पुरुषप्रधान संस्कृतीचे अमोल आता काय नी कसे वर्णन करणार आणि आशूला ते सगळे कसे समजावून सांगणार ह्याची पण उत्सुकता लागली होती. मी अमोलला म्हंटले " सांगा अमोल गोवंडे, तुमचे नाव काय होते लग्नाआधी आणि नंतर; आणि ते का नाही बदलले ?"
अमोलने आशयला सांगितले,' अरे बाळा, माझे लग्नापूर्वीचे आणि नंतरचे दोन्ही नावे अमोल गोवंडे अशीच आहेत".
"असे का?" हे आशय विचारणार इतक्यात आशयचे लाडके गाणे " राधा, राधा, राधा, राधा, राधा कुठे गेली माझी ?" सुरु झाले. आशयने फक्त एकदा अमोलकडे प्रश्नार्थक नजरेने पहिले आणि तो गाणे ऐकण्यात आणि गुणगुणण्यात दंग झाला.
अमोलने सुटकेचा श्वास सोडला, पण मला मात्र अमोलचा चेहरा बघूनच हसू येत होते.
याशिवाय अनेक निरर्थक प्रश्न क्षणात गर्दी करून समोर उभे ठाकले पण सवयीने "हा सामाजिक जडण घडणीचा भाग आहे असे स्वतःच स्वतःला समजावून मी त्यांची उत्तरे शोधणे टाळले.

Thursday, September 22, 2011

आयुष्य हे असे
नात्यात गुंतलेले

असूनी मोकळे
 मन गुंफलेले

जाणीव असे
जीव वेढलेले

व्रत जगण्याचे
आम्ही स्वीकारलेले

Tuesday, September 20, 2011

टोमॅटो- उसळ आणि फॅमिली...

आशयची शाळा सध्या लवकर सुटत असल्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून आम्ही तिघे दुपारीही एकत्र जेवायला बसत होतो.
आज मुगाची उसळ, टोमॅटोचे काप आणि लोणचं असा बेत होता. जेवता जेवता अचानक आशयने विचारले, "मम्मा, टोमॅटो मुलगा आहे का आणि उसळ मुलगी ???". मी गोंधळले. हा असं का विचारत आहे ते कळेना. मग त्यालाच उलट प्रश्न केला, "का रे ??". त्याचे उत्तर तयारच होते. "कारण आपण तो टोमॅटो म्हणतो आणि ती उसळ. म्हणजे मग टोमॅटो मुलगा आणि उसळ मुलगी झाली ना आणि त्यांची फॅमिली !!". मला आणि अमोलला हसूच आवरेनासे झाले .. आम्ही दोघेही खो खो हसायला लागलो, तसा आशय म्हणाला, "तुम्ही एवढे जोराने का हसत आहात ??".
मग अमोलने त्याला आणखी विचारले, "मग लोणचे काय असेल ? मुलगा कि मुलगी ?" तसे आशय म्हणाला, " ते म्हणजे ते मोठे आहे ना त्यांच्या फॅमिलीमध्ये. जसे आबांना (आजोबांना) आपण ते आजोबा म्हणतो तसे". अमोलला आणि मला त्याच्या विचारशक्तीचे कौतुक वाटले. अमोलने आशयची थोडी चेष्टा करायची म्हणून आणखी विषय वाढवत त्याला विचारले, "पण तू तर आजीला 'ए आजी इकडे ये' असे म्हणतोस. ती तर तुझ्यापेक्षा मोठीच आहे ना ?". आशय लगेच उत्तरला पण मी आबांना "ओ आबा, इकडे या हो" असे म्हणतो ना !! अमोलपण रेटाने म्हणाला पण आजीला "ए आजीच म्हणतोस ना !!" या प्रश्नाचे उत्तर आशयला खरच माहित नव्हते, किंबहुना ते त्याच्या बालबुद्धीच्या आकलनापलीकडले होते.
मलाही लहानपणी माझ्या काकांनी त्यांना "ए काका" असे म्हंटल्यामुळे खूप रागावल्याचे आठवते. अगदी मला रडू येईपर्यंत त्यांनी मला सुनावले होते. तेव्हाही हा प्रश्न खूप प्रकर्षाने जाणवला होता. पण विचारायची हिम्मत मुळीच नव्हती. बरंच मोठं झाल्यानंतर कळले कि पुरुषप्रधान संस्कृती असल्याने "आजोबा, वडील, काका, यांना सगळ्यांना आदरार्थी बोलायचे आणि आजी, आई, मावशी यांना अगं, तूगं असे एकेरी बोलायचे".

Wednesday, May 11, 2011

तारे कसे बनतात?

आशयला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या.
रोज काहीतरी नवीन पाहणे, ऐकणे आणि त्यावर चर्चा करणे हा त्याचा नित्याचाच दिनक्रम झाला होता.
पाळणाघरात दिवसभर धिंगाणा घालूनही त्याची खिलाडू वृत्ती आणि खेळण्याचा उत्साह दोन्हीही, संध्याकाळपर्यंत कमी झालेले नसायचे. त्यात सध्या सुट्ट्यांमुळे सगळीच मुले दिवस भर खेळत राहत.
आज माझाही सुट्टीचा दिवस म्हणून आम्ही सर्वजण टीव्हीसमोर बसून मजेत सिनेमा पहात होतो. तितक्यात त्यातल्या एका पात्राने मरणाविषयी काहीतरी सांगितले. आशयला "मरण आणि त्यानंतर काय ?" हा प्रश्न नेहमीच पडतो. आत्तापर्यंत खूप वेगवेगळ्या प्रकाराने त्याने याविषयी विचारून, जाणून घ्यायचा प्रयत्न केला होता. पण दरवेळेस आम्ही त्याला शिताफीने हा विषय बदलून दुसऱ्या गोष्टींकडे वळवायचो.
आज त्याने अचानक तो विषय पकडला. आम्हाला तो सांगू लागला, तुम्हाला माहित आहे, "माणूस मेल्यावर आकाशात जातो आणि तारा बनतो. मी आणि अमोल (आशयचा बाबा) एकमेकांकडे पाहून चमकलोच.कारण आम्ही काहीही न सांगता हा एवढ्या विश्वासाने याविषयी बोलत आहे. आमची पण उत्सुकता ताणली गेली. मी त्याला विचारले, 'तुला कुणी सांगितले हे ? कुठल्या सिनेमात पाहिलेस का ? का टीव्हीवर कळले ?'. सगळ्या प्रश्नांना नकारार्थी मान हलवून सावकाशपणे आशय म्हणाला, "हे तर मला क्षितिजने सांगितले (हा क्षितीज म्हणजे त्याचा पाळणाघरातला, त्याच्यापेक्षा १ वर्षांनी मोठा असलेला त्याचा मित्र)". मी परत त्याला विचारले, ' पण त्याला कुणी सांगितले ?'. आशयकडे याचेही उत्तर तयार होते. तो लगेच उत्तरला, "क्षितिजला त्याच्या मम्माने सांगितले. त्याचे दादाजी /आजोबा पण देवाघरी गेलेत न, तर ते पण तारा बनले आहेत आणि रोज रात्री क्षितिजला बघतात. म्हणून तर आकाशात इतके सारे तारे आहेत. मोजता पण येत नाहीत". मला कौतुक आणि चिंता वाटली. ही एवढी एवढीशी मुले, पाळणाघरात काय काय विषयांवर गप्पा मारतात !!
मी त्याला सांगितले कि, "बाळा, माणूस मेल्यावर तारा बनत नसतो आणि तारे म्हणजे मेलेली माणसे नसतात"। क्षणभर मी त्याला काहीतरी अतार्किक सांगत असल्यासारखे त्याने माझ्याकडे बघितले, आणि पटकन विचारले, "मग तारे कसे बनतात ? ते कुठून येतात ? त्यांना कुणी तयार केले ?" आता त्याला कसे समजवावे, त्याला समजेल असे कसे सांगावे ह्याचा विचार करत करत मी आणि अमोलने एकमेकांकडे पाहिले. दोघांच्याही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह !! क्षणभर विचार करून मी आशयला सांगितले, 'तुला ताऱ्यांची गोष्ट सांगू न .. तेव्हा त्यात तुला कळेल कि ते कसे बनतात, कुठून येतात, त्यांना कोण तयार करतं, इत्यादी'. गोष्ट ऐकायला मिळणार म्हणून आशय खुश झाला आणि परत टीव्ही बघू लागला.
आम्ही दोघे, मी आणि अमोल मात्र त्याच्यासाठी ताऱ्यांची गोष्ट शोधायची कुठून किंवा कशी तयार करायची ह्याचा विचार करू लागलो.